राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत परत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी सरकार जबाबदार असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारच्या पोलिस विभागात सततच्या हस्तक्षेपामुळे जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे, आणि असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले आहे, असे सांगत फडणवीस यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

जयस्वाल यांना केंद्रानी केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाच्या महासंचालक पदी नियुक्त केले आहे. महाराष्ट्र पोलिस दल महासंचालकांना विश्वासात ने घेताच कार्य करत होते, महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत आहे. यामुळे नाराज होत जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे, असे देखील फडणवीस म्हणाले. राज्य सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे असे होत आहे, असेही त्यांनी सांगितले. जयस्वाल यांनी केंद्राकडे प्रतिनियुक्ति मागितली आणि ती केंद्रानी मंजूर केली.
लोक येत जात असताता, मात्र चांगली माणसे असे घालवणे योग्य नाही :
“पोलिस विभाग गृहखात्याच्या अंतर्गत येत असले तरी देखील ते एक स्वायत्त आणि स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळे त्यात छोट्यातील छोट्या बदलांमध्ये देखील राज्य सरकारचा हस्तक्षेप योग्य नाही. या हस्तक्षेपाला कंटाळून एक चांगला अधिकारी राज्य सरकार मधील काम सोडून गेला, याची खंत वाटते. लोक येत जात राहतात, मात्र चांगली माणसे असे घालवणे योग्य नाही. पोलिसांच्या मनोधैर्यावर याचा काय परिणाम होईल? याबद्दल देखील विचार केला गेला पाहिजे. महाराष्ट्रासाठी हे काही भूषणावह नाही.” अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
पोलिस दलाशी संबंधित काही निर्णयावरुन जयस्वाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये विसंवाद होता, त्यामुळे जयस्वाल यांनी केंद्रीय विभागात परतण्याची मागणी केली होती, जी मान्य करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस विभागासाठी ही एक खेदकारक बाब आहे.
