
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अंबानी यांच्या घरासमोरून सापडलेल्या गाडीतील विस्फोटके आणि त्यानंतर त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या सापडलेल्या मृतदेहामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. यामुळे राज्य सरकार वर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात सचिन वाझे यांचा असलेला संबंध, मनसख हिरेन यांची हत्या, तसेच विस्फोटके यामागे दहशतवादी संघटनेचा हात तर नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित होतो. सचिन वाझेंच्या भूमिकेवरून विरोधी पक्षाने मात्र सरकारवर सणसणीत टीका केली आहे, तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आलेच पाहिजे, असे देखील विरोधी पक्षाने म्हटले आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “या बाबतीतलं सत्य लवकरात लवकर पुढे यांव. सचिन वाझे हे गेली १६ वर्षे निलंबित एपीआय आहेत. आम्ही आधी पासूनच सांगत होतो, कि सचिन वझे यांची चौकशी झाली पाहिजे, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई देखील झालीच पाहिजे, मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचा बचाव करत होते. सचिन वाझे हे उच्चन्यायालयाकडून निलंबित आहेत, गेली १६ वर्षे. मी मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेच्या नेत्यांनी सचिन वाझे यांना पुन्हा रुजु करण्यात यावे यासाठी मागणी केली होती, मात्र त्याला नकार देण्यात आला होता. आता हे सरकार आल्यानंतर त्यांनी सचिन वाझे यांना परत कामावर रुजु करण्यात आले आणि त्यांना महत्वाच्या केसेस देखील सोपविण्यात आल्या. ते निलंबित असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि ते प्रवक्ता म्हणून देखील काम करत होते.” असेही त्यांनी सांगितले. फडणवीस यांच्या या वक्तव्यातून सचिन वाझे आणि शिवसेना दोन्ही शंकेच्या कचाट्यात सापडतात. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई येथे मुकेश अंबानी यांच्या एंटालिया या घरासमोर एका गाडीत विस्फोटके सापडली होती, त्यानंतर ती गाडी ज्यांची होती ते हिरेन मनसुख यांचा मृतदेह सापडला आणि एकच खळबळ माजली. त्यातच या प्रकरणात संशयित म्हणून सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एकूण प्रकरण काय आहे ? मनसुख यांचा खून कुणी केला आणि विस्फोटके त्या गाडीत कोणी ठेवली याविषयी अजून उलगडा झालेला नाही. त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
