“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एक व्यक्ति नाही तर एक विद्यापीठ होते. आज याठिकाणी त्यांच्या स्मृति उभ्या राहत आहेत, हा त्यांचा मोठा गौरव आहे. प्रत्येक मराठीजनाचा, महाराष्ट्रीयन माणसाचा सुद्धा हा गौरव आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे स्मारक रशियात लोकार्पित झाले आहे.” अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. रशियाच्या मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. भारताकडून या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, मिलिंद कांबळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

आजचा हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक असल्याचेही फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले. महाराष्ट्र आणि भारतातील दलित, वंचित वर्गातील व्यक्तीचा रशियासारख्या राष्ट्राकडून गौरव होत असल्याने ही निश्चितच आमच्यासाठी गौरवाची बाब असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फकिरासारख्या कादंबरीने साहित्यात वेगळी छाप उमटवली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून दलित, मजूरांची , पीडितांची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी केला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो अशी भावनाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हिंदुस्थान-रशिया संबंधांची 75 वर्षे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव,असे सर्व योग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबतसुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्यात भेटीगाठी तेथे होणार आहेत.
