महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 80 टक्के म्हणजे तब्बल 152 जागा निवडून येतील, असा ठाम दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आम्ही राज्याच्या दृष्टीने गणिते आखली आहेत. त्यानुसार आगामी सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असेल, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षावर नाराज नसल्याचेही नमूद केले. पंकजा मुंडे यांच्या लहान बहिनीची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही. पण त्या बीड लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत, असे ते म्हणाले.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाला आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र भाजपची बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 80 टक्के म्हणजे तब्बल 152 जागा निवडून येतील असा ठाम विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्या प्रशिक्षण वर्गात प्रत्येक बुथवर प्रत्येकजण महत्वाचा घटक आहे. प्रत्येक समाजापर्यंत आम्ही जाणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारची विकास कामे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात महायुतीच्या 220 जागा निवडून येतील. महाविजय 2024 चा आम्ही संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत 152+ जागांवर दावा करणारे देवेंद्र फडणवीस यांचे एक मोठे पोस्टर महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत दिसले. त्याचबरोबर या पोस्टरमध्ये मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांचाही उल्लेख आहे. पोस्टरमध्ये फडणवीस 152+ याकडे बोट दाखवताना दिसत आहेत.
भाजपने स्वत:साठी 152+ जागांचे लक्ष ठेवले आहे. मात्र आता यासंदर्भात नवीन वाद होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्यामुळे एकटा भाजप 152 जागांवर दावा करत असेल,तर भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
