लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रावरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय.- १७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचविण्यात आले.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे .
गडचिरोली-चिमुर लोकसभेत बहुतांश विभाग हा नक्षलवादी विभाग असल्याने तो अतिसंवेदनशील भागात मोडतो. त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भागांमध्ये नक्षलवाद्यांकडूनही कधीही घातपात घडवून आणण्याची शक्यता असते. ज्यामुळे याच भीतीमुळे आज या लोकसभेतील अनेक भागांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे एअर लिफ्ट करण्यात आले आहे. अनेक भागांमध्ये मतदान केंद्रावर पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
