बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मोठी खबरदारी; अजित पवार हे बारामतीचे ‘डमी’ उमेदवार

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या बारमती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी मुख्य लढत असणार आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीने मोठी खबरदारी घेतली आहे. या मतदारसंघात अजित पवार यांनी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून उमेदवारीचा अर्ज घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सचिन दोडके यांनी अर्ज घेतला आहे.

बारामती मतदारसंघाची निवडणूक ही अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात चूरस निर्माण झाली आहे. पवार आणि महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगफटका होऊ नये, यासाठी अजित पवार यांच्याकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल आहे. त्यामुळे १८ एप्रिल रोजी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत. सुनेत्रा पवार, पुणे मतदार संघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत.या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये, म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून स्वतः अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आला आहे.