सातारा लोकसभा मतदारसंघातील बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून भाजपतर्फे तिकीट घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे साताऱ्यात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीकडून भाजपचे उदयनराजे भोसले अशी रंगतदार लढत होणार आहे. भाजपने आपली पुढची उमेदवार यादी जाहीर केली, त्यात उदयनराजेंचं नाव आहे.
भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपआपला दावा केला जात होता. परंतु भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. परंतु अधिकृत घोषणा होण्यास दीर्घ कालावधी लागला.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स संपला आहे. साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती. अखेर आज भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवत उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केली. आता महायुतीतील तिढा वाढली की संपला हे आताच सांगणे कठीण जाणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या बदल्यात कोणती जागा मिळणार या बाबत सस्पेन्स काम आहे.
राजघराण्यातील असूनही उदयनराजेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवकपदापासून केली. १९९६ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतरच्या सातारा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते विजयी झाले होते. महाराष्ट्रातील शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारच्या काळात ते महसूल राज्यमंत्री देखील होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नानं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
