महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त नुकतंच समोर आलं. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले. एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता.धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहे. वेगवेगळ्या नंबरवरुन खडसेंना धमकीचे फोन आले आहेत. विविध देशातून फोन येत असल्याची एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आला. देशासह परदेशातील क्रमांकांचा यामध्ये समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. धमकी देणाऱ्याने छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार असल्याचं सांगितलं. तसंच तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. हे लोक तुम्हाला मारणार आहेत असं पुन्हा कॉल करून धमकी देणाऱ्याने सांगितलं. फोनचे लोकेशन हे अमेरिका, उत्तर प्रदेशातल्या लखनऊमधले असल्याची माहिती समजते.
४ ते ५ वेळा खडसेंना फोन आला आहे. एक फोन अमेरिकेवरून आला आहे, तर एक लखनऊ येथून आल्याची माहिती आहे. त्याबाबत एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. याआधी देखील त्यांनी धमक्या देण्यात आलेल्या आहेत. धमकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
