धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, अशा प्रकारचा पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो.मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्षातील लोकांनी माझ्यासाठी कष्ट केले. सर्वांनी माझ्याबरोबर ताकद उभी केली होती. त्यामुळेच आता पक्ष सोडताना मला खुप दुःख होत आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, “आपण सगळी माणसं आहोत. अशा प्रसंगी आपल्याला दुःख होतंच. मात्र, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सांगत होते, चर्चा करत होते. माझी मतदारांशी चर्चा झाली. त्या सर्वांचं म्हणणं आहे की आमची कामं कोण करणार? लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाही. अशा वेळी माझी दोन-तीन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री उदय सामंत हे देखील माझे मित्र आहेत. माझी त्यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी वारंवार सांगितलं की एकदा आमच्याबरोबर काम करा.
शिवसेना नेते, उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी धंगेकर यांना पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ‘मी लपून जाणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ असे धंगेकर यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
धंगेकर यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक विजयाची नोंद केली होती. त्यांनी कसब्याचे विद्यामान आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, भाजपचे उमेदवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर यांना हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ते काँग्रेस सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.
