वडिलांचा विरोध पण मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नविद मुश्रीफ गोकुळच्या अध्यक्षपदी

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : वडील हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर नविद मुश्रीफ यांच्या नावाची कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या घोषणा करण्यात आली.
( Despite fathers opposition Navid Mushrif becomes Gokul chairman after Chief Ministers intervention)

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदी कोण बसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी ( संध्याकाळपासून शुक्रवारी वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झाली. अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर गोकुळचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत हस्तक्षेप करत अध्यक्ष महायुतीचाच असावा, असा आग्रह धरला होते. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील, विनय कोरे तसेच गोकुळच्या सत्ताधारी संचालकांच्या बैठका घेतल्या.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (29 मे) घेतलेल्या बैठकांमध्ये शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव मागे पाडले आणि महायुतीकडून नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील आणि अजित नरके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यावेळी अजित नरके आणि अमरीशसिंह घाटगे यांच्या नावाला विरोध करण्यात आला. त्यामुळे नविद यांचेच नाव सर्वांसमोर होते. पण नविद मुश्रीफ यांच्या नावाला त्यांचे वडील हसन मुश्रीफ यांचाच विरोध होता. यावेळी त्यांनी, ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपद या दोन्ही मोठ्या सहकारी संस्थेचे अध्यक्षपद एकाच घरात नको, असे म्हणत त्यांनी विरोध केला. पण सर्वमान्य चेहरा म्हणून नवीद यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.