विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडले, अन् विरोधकांवर भडकले संजय शिरसाट

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर येथील विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार असल्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. विट्स हॉटेल लिलावात संजय शिरसाट यांच्या मुलाने सहभाग घेतला होता. यावरून संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. (Will be out of the auction of Wits Hotel in Chhatrapati Sambhajinagar Sanjay Shirsat clarified)

संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मी सांगतो त्यावर विश्वास ठेऊ नका. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा. या हॉटेलच्या लिलावाची ही सातवी वेळ होती. मराठी व्यक्तीचे नाव घेताना लाज वाटत नाही का? मराठी माणसांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांचे पाय ओढले जात आहेत. त्यांचे मनपात जे दलाल होते, त्यात एकही मराठी व्यक्ती नव्हता. व्यक्तीने राजकारण करावे, पण इतक्या खालच्या स्तरावर राजकारण करु नये. या प्रकरणात कशी सूत्र फिरली, मला बदनाम करण्याचा कसा प्रयत्न झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी योग्य वेळी देईल.
उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जी काही प्रोसेस आहे, पत्र द्यायला लावतोय आणि त्या प्रकरणातून बाजूला होतोय. जे 110 च्या गप्पा करतात त्यांना सांगतो की आता तुम्ही घ्या. पेढे घेऊन मी तुमच्याकडे येईल.

शिरसाट म्हणाले, हॉटेलची संपूर्ण लिलाव प्रक्रिया कायदेशीर आहे. बोली लावताना डिपॉझिट भरावे लागते. ते भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. आता एका महिन्यात २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर बँकेची प्रक्रिया पार पाडत तीन महिन्यांत उर्वरित पैसे भरावे लागतील. मगच संपूर्ण व्यवहार पूर्ण होतील. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत सर्व व्यवहार कायदेशीर झाले आहे. परंतु दलालांनी बदनाम करण्याचे काम सुरु केले. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही, ते असे बोलत असतात,
संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही हॉटेल 90 कोटीमध्ये घ्या नाहीतर 100 कोटीमध्ये घ्या नाहीतर 76 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुमच्या स्वागताला येईल. मराठी माणूस उभा राहिला पाहिजे असे वाटत असेल तर तुम्ही हिम्मत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. रात्रीची उतरली नाही म्हणून असे स्टेटमेंट करून त्याची बातमी होऊ शकते. परंतु कोणाचे चारित्र्यहनन होऊ शकत नाही.

कोणाच्या तरी धंद्यावर, व्यवसायावर तुम्ही आज लाथ मारलेली आहे. माझे त्यात 10-15 लाख रुपये गेले असतील. जाऊ द्या. परंतु तुम्ही हे केलेले पाप तुम्हाला फेडावे लागेल. तुम्ही व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे. तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये जे आयुष्य गेलेले आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील, असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

या पुढे वैयक्तिक आरोप करायला जर सुरुवात केली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे. तुमच्या सर्व स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. ज्या दिवशी मी त्या बाहेर काढायला सुरुवात करेल. संजय शिरसाट आहे मी, घराला आग लावायची कमी करणार नाही. एवढा चक्रम आहे मी. राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही आरोप-प्रत्यारोप करा त्याचे उत्तर देईल. परंतु व्यवसायात, मुला-बाळांमध्ये अशा चर्चा करत आहेत. त्याचे परिणाम तुम्हाला काही काळात दिसून येतील, असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला आहे.