विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक मोठा आधारस्तंभ ठरतो आहे. विशेषतः कोकण विभागात गेल्या केवळ सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल २,७३८ रुग्णांना २५ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांची अर्थसहाय्य रूपाने मदत मिळाली आहे. ही मदत थेट रुग्णांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
( Relief for needy patients in Konkan more than 25 crores of assistance from the Chief Ministers Relief Fund in seven months)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेच्या अंमलबजावणीत विविध सकारात्मक सुधारणा करण्यात आल्या असून “पेपरलेस” प्रणाली, जिल्हास्तरीय सहाय्यता कक्ष, तसेच डिजिटल फॉर्म सबमिशन सिस्टम यामुळे रुग्णांना मंत्रालयात चकरा माराव्या लागत नाहीत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, तसेच धर्मादाय रुग्णालयांच्या योजना या उपचारासाठी प्रथम प्राधान्याने वापराव्यात. त्या योजनांतर्गत लाभ मिळू शकत नसेल, तर संबंधित रुग्णालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्रस्ताव पाठवता येतो.
या २० गंभीर आजारांसाठी मदत उपलब्ध :
1. कॉक्लियर इम्प्लांट (वय २-६)
2. हृदय प्रत्यारोपण
3. यकृत प्रत्यारोपण
4. किडनी प्रत्यारोपण
5. फुफ्फुस प्रत्यारोपण
6. बोन मॅरो ट्रान्सप्लांट
7. हाताचे प्रत्यारोपण
8. हिप रिप्लेसमेंट
9. कर्करोग उपचार (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)
10. रस्ते अपघातातील उपचार
11. बालरोग सर्जरी
12. मेंदूचे आजार
13. हृदयविकार
14. डायलिसिस
15. अस्थिबंधन तुटणे
16. नवजात शिशूंचे आजार
17. गुडघ्याचे प्रत्यारोपण
18. भाजलेले रुग्ण (Burns)
19. विद्युत अपघातग्रस्त
20. झेडटीसीसीमार्फत अवयव प्रत्यारोपण
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड आणि रेशन कार्ड
रुग्ण दाखल असल्यास जिओ टँग फोटो
उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)
आजाराचे वैद्यकीय अहवाल
उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाचे प्रमाणपत्र
रुग्णालयाची मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रणालीवर नोंद
अपघातग्रस्तांसाठी एफआयआर
अवयव प्रत्यारोपणासाठी ZTCC नोंदणी पावती
अर्ज पाठवण्याची पद्धत :
सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या अधिकृत ईमेलवर पाठवावीत.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक – १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पारदर्शकतेला सर्वाधिक प्राधान्य देत कामकाज राबवले जात आहे. राज्यभरातील गरजू रुग्णांपर्यंत निधी वेळेत पोहोचावा, यासाठी जिल्हास्तरीय कक्ष आणि ऑनलाइन प्रणालींचा सकारात्मक उपयोग होत आहे. भविष्यातही अधिकाधिक गरजूंना मदत देण्याचा निर्धार कक्षाने व्यक्त केला आहे.
