एआय फोटो एडिंटिंगवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पाहिला गुन्हा; तरुणीला अश्लील फोटोची धमकी

विशेष प्रतिनिधी
पुणे : तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापराचे धक्कादायक उदाहरण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात समोर आले आहे. शहरातील एआय फोटो एडिटिंगवर आधारित हा पहिलाच गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ( First AI Photo Editing Crime in PunePimpri-Chinchwad Woman Threatened with Obscene Images)

तरुणीच्या इंस्टाग्रामवरील फोटोतील ड्रेस गूगल एआयच्या साहाय्याने बदलला आणि तिला पाठवला. तसेच तिचे अश्लील फोटो तयार करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एआय फोटो एडिटिंगबाबत अशा प्रकारचा पहिल्याच गुन्ह्याची नोंद झाली आहे.

एका तरुणीच्या इंस्टाग्रामवरील फोटोतील ड्रेस गूगल एआयच्या साहाय्याने बदलून तो संपादित फोटो तिला पाठवण्यात आला. त्यानंतर आणखी पुढे जाऊन तिचे अश्लील फोटो तयार करण्याची धमकी देण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

आरोपीने इंस्टाग्रामवर “manu_85_30” नावाने प्रोफाइल तयार करून तरुणीशी संपर्क साधला होता. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या आणि आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांना मानसिक त्रास दिला जात असल्याची धोक्याची घंटा या घटनेतून वाजली आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोशल मीडिया आणि एआय टूल्सच्या वापरावर कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना त्वरित गांभीर्याने घेतले जाईल. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावर मिळालेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशांविषयी लगेच पोलीस ठाण्यात कळवावे.
हा प्रकार एआयच्या “डार्क साईड” चे भयावह चित्र दाखवतो. योग्य वापर केल्यास हेच तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, पण चुकीच्या वापरामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याचा धोका वाढला आहे.