विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ ( वय 83) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. ( Senior ecologist Dr. Madhav Gadgil passes away)
डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ गमावला आहे. 1981 साळी त्यांना पद्मश्री तर 2006 साळी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1986), टाइलर पुरस्कार (2015), संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार (2024) त्यांना मिळाले आहेत.
पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर मांडली. जंगल, नद्या, डोंगररांगा आणि ग्रामसमुदाय यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत त्यांनी अनेक संशोधन लेख, पुस्तके आणि अभ्यास अहवाल सादर केले.
डॉ. गाडगीळ यांनी देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये अध्यापन व संशोधन केले. भारतीय विज्ञान अकादमीसह विविध शैक्षणिक संस्थांशी ते दीर्घकाळ जोडलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक घडले. डॉ. गाडगीळ यांच्या निधनावर पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. “पर्यावरणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा अभ्यासू विचारवंत हरपला,” अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.
डॉ. माधव गाडगीळ यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र तसेच नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मूलभूत आणि दिशादर्शक संशोधन केले. त्यांच्या अभ्यासामुळे पर्यावरणीय समस्या समजून घेण्यास वैज्ञानिक अधिष्ठान मिळाले. ते भारतीय विज्ञान संस्थेत (IISc) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अध्यापनासोबतच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यास, संशोधन आणि संवर्धनाच्या कार्यासाठी प्रेरित केले.
