राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या,आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया च्या नागपूर सेंटर यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.
या करारानुसार नागपूर सेंटरमधील ५० जागा अनुसूचित जातीच्या युवक – युवतींसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजातील नव उद्योजकांना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने रेड कार्पेट उपलब्ध झाले आहे. राज्यात प्रथमच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी क्षेत्रात शासन स्तरावरुन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून पाऊल पडले आहे.
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अधिनस्त असलेले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया चे नागपूर येथे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय चे सहसचिव संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (पुणे)चे संचालक डॉ. संजयकुमार गुप्ता, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (पुणे) चे महासंचालक अरविंद कुमार, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, जितेंद्र देवकाते उपस्थित होते.
नव उद्योजकीय स्टार्ट-अपला पाठिंबा देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनुसूचित जातीतील ५ युवक-युवतींना महात्मा फुले महामंडळाच्या पीएम-अजय योजनेंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण २ लाख ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य यावेळी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. नव उद्योजक घडण्यास यामुळे मदत होणार असून हजारो युवकांना प्रेरणा व रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
