सुनेला अशा प्रकारची वागणूक देणे पाप, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : आज 21व्या शतकात जेव्हा मुली आणि सूनांमध्ये कोणताही फरक करणं चुकीचं आहे. सुनेला अशा प्रकारची वागणूक देणे हे अतिशय पाप आहे. ते या ठिकाणी झालं आहे. सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना केला. ( It is a sin to treat a daughter-in-law like this Chief Ministers anger over Vaishnavi Hagavanes suicide case)

गेले काही दिवस वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणात गेले सात दिवस फरार असलेले सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शुक्रवारी पहाटे आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही तपास करून त्या गोष्टी पोलीस करतीलच. छळ करून आत्महत्या करायला लावणे या गोष्टी सहन होण्यासारख्या नाहीत. या प्रकरणी जे करता येईल ते आम्ही करू.”

मकोकाबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, “मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत. नियमात बसले तर मकोका लावू शकतो. पण मकोका लागेल की नाही हे आजच सांगता येणार नाही. त्यावर मी आता काही बोलू शकत नाही.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘अजित पवार याप्रकरणी गंभीर नाही असे नाही. कोणत्याही कार्यकर्त्याकडे, समाजात लग्नाला बोलावलं तर आपण जातो. पुढे काय घडणार याची कल्पना आपल्याला नसते. एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. पुढेही उचित कारवाई करतील. आता या प्रकरणाला खूप फाटे फोडता कामा नये.