मोदीद्वेषातून ममता बॅनर्जी बरळल्या, सिंदूरवरून पंतप्रधानांवर टीका करत वादग्रस्त विधान

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक पातळीवर टीका करत राजकीय वर्तणुकीच्या सीमाच ओलांडल्या आहेत. कोलकात्यात गुरुवारी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना ममतांनी म्हटले, “पंतप्रधान मोदी असे बोलतात जणू ते प्रत्येक महिलेचे पती आहेत. मग ते त्यांच्या पत्नीला सिंदूर का लावत नाहीत?” ( Mamata Banerjee rages over Modi hatred makes controversial statement criticizing PM over Sindur)

त्यानंतर लगेच त्या म्हणाल्या, “मला हे बोलायचं नव्हतं, पण त्यांनी मला बोलायला भाग पाडलं.” सिंदूर या पारंपरिक आणि पवित्र घटकावरून ममतांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ममतांनी पुढे सांगितले की, “सिंदूर हे पतीसाठी असते. ऑपरेशन सिंदूरवर मी भाष्य करणार नाही. पण प्रत्येक स्त्रीचा एक सन्मान असतो.”

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे आपल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानवरील कारवाई, आणि बंगालमधील भ्रष्टाचारावर भाष्य केल्यानंतर, ममतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं. त्यांनी विचारलं, “पंतप्रधानांनी जर पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं, तर आता ते ‘ऑपरेशन बंगाल’ राबवणार आहेत का?”

त्यानंतर त्यांनी मोदींना थेट आव्हान दिलं की, “तुमच्यात हिंमत असेल, तर माझ्यासमोर स्क्रिप्टविना चर्चेसाठी या. टेलीप्रॉम्प्टर घेऊन या, काही हरकत नाही. पण प्रश्नांना उत्तरं द्या.”

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि बंगालविरोधात खोट्या बातम्या पसरवण्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “तुम्ही प्रत्येक काम फक्त स्वतःच्या नावावर घेता. जर खरंच देशासाठी काही करायचं असेल, तर सैन्यासाठी खास प्रकल्प सुरू करा.”

दुसरीकडे, केंद्र सरकार ९ जूनपासून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचे जनतेपर्यंत प्रचारासाठी ‘घराघर सिंदूर’ मोहीम राबवणार आहे. यामध्ये महिलांना सिंदूर भेट दिला जाईल आणि ऑपरेशनविषयी माहितीपत्रके वाटली जातील. ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असल्याने या दिवशीच ही मोहीम सुरू होणार आहे.

७ मे रोजी भारताने पहाटे १.०५ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या कुटुंबातील १० जणांसह ४ जवळचे साथीदार ठार झाले. ही कारवाई २५ भारतीय पर्यटकांच्या हत्येचा बदला म्हणून करण्यात आली होती.