विशेष प्रतिनिधी
मुंबई : चार महिन्यानंतर भाषणे सुरू होतील, महाराषट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण, आताच सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप आणि त्याचा बाप, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावावर राहिली’ या कवितेतील काही ओळी म्हणत मुंबईचे महत्व विषद केले. ( No matter whose father comes Mumbai belongs to Maharashtra and will remain soChief Minister targets Uddhav Thackeray)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिडकोचा विकास, इंदू मिल स्मारक, नवी मुंबईतील एक्झिबिशन सेंटर अशा अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान मी जे बोललो ते सगळे प्रकल्प होताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठल्याही प्रकल्पांचा वेग कमी होऊ दिला नाही. अजित पवार हे कुबेर आहेत. त्यांच्याकडे तिजोरीची किल्ली आहे. त्यांनी तिजोरी अडवली नाही. नाहीतर डुप्लिकेट किल्ली करावी लागली असती. पण, ती संधी अजित पवार यांनी दिली नाही.”
“मुंबई सामान्य माणसांचा चेहरा बदलणारे प्रकल्प हे निश्चितपणे करून दाखवणार आहोत. प्रत्येक वर्ष दोन वर्षांनी लोक मुंबईत येतात. त्यांना ती जरवेळी बदलेली दिसते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती कुणाच्याही वाट्याला येऊ नये. अशाप्रकारचा प्रयत्न आपण करत आहोत. अण्णाभाऊ साठे यांची मुंबईवर एक कविता आहे,” असे म्हणत कवितेच्या ओळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवल्या आहेत.
या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची
मढयावर पडावी मूठभर माती, तशी गत झाली आमची
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची, शेंडीची, दाढीची
हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची
बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची
पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची
भांडवलदारांची, पोटासाठी पाट धरली होती मी कामाची, पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची, पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची
“अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुद्धा कवितेत नांदी केली आहे. कविता वाचण्याचं कारण एकच आहे. चार महिन्यानंतर भाषणे सुरू होतील, महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे आत्ताच सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाच बाप, त्याच बाप, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील. महाराष्ट्रात मराठी माणसांचा आवाज बुलंद राहिल. आधुनिक आणि सर्वसमावेशक मुंबई आणि प्रगतशिल महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे फडणवीस म्हणाले.
