विशेष प्रतिनिधी
पुणे : कंपनी सोडल्यानंतर चार तरुणांवर त्यांच्या जुन्या कंपनीने डेटा चोरीचा आरोप केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी ते नाशिकहून कोथरूड पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्यात जुन्या कंपनीचे प्रतिनिधी आणि या चार तरुणांमध्ये झालेल्या चर्चेनंतर त्यांच्यातील वाद मिटले. मात्र, पोलीस ठाण्यातून कारने परत जात असताना वाटेत त्यांना गाठून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ( Data theft in company four people were fatally attacked by three as they left the police station)
याबाबत संदीप कैलास लवाटे (२८, रा. गणेशनगर, मनमाड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पौड रस्त्यावरील साई प्रतिष्ठान चौकात सोमवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप लवाटे हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांनी तेथे जाऊन फिर्याद घेतली. ते सध्या नाशिक येथील एका कंपनीत ४ महिन्यांपासून काम करत आहेत. यापूर्वी ते कोथरूड येथील एका कंपनीत नोकरीला होते. नाशिक येथील योगेश दुसाणे, प्रवीण गायकवाड आणि सचिन केदार हे सुद्धा पुण्यातील कंपनीत नोकरीस होते. मार्च २०२५ मध्ये लवाटे यांनी नोकरी सोडली.
त्यांच्याबरोबर योगेश दुसाणे, प्रविण गायकवाड व सचिन केदार यांनीही शहरातील कंपनी सोडून नाशिक येथील एका कंपनीत नोकरी स्वीकारली. योगेश दुसाणे यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. फिर्यादी व इतरांना कोथरूड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानुसार ते २१ जुलै रोजी कोथरूड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आले होते. त्यांच्यावर पूर्वीच्या कंपनीतील डेटा चोरून दुसर्या कंपनीला दिला म्हणून तक्रार करण्यात आली होती. यावेळी कंपनीतील लोकही उपस्थित होते. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीचे समाधान झाले. त्यानंतर ते सर्व जण नाशिकला परत जात होते.
हल्ला कसा झाला?
कारमधून जात असताना चौघे साई प्रतिष्ठान चौकातील सिग्नलला थांबले. त्याचवेळी एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर एका व्यक्तीने पुढे येऊन चालक योगेश दुसाने यांना बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या एकाने फिर्यादी यांना कारमधून बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याने धारदार हत्याराने डोक्यात मारले, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याने योगेश दुसाने यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून त्यांना जखमी केले. आणखी एकाने सचिन केदार आणि प्रवीण गायकवाड यांना कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्लेखोरांपैकी एकाला फिर्यादीने ओळखले आहे. हा हल्लेखोर त्यांच्यासोबत पूर्वीच्या नोकरीत होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करत आहेत.
