इस्टाग्रामवरील फोटोवर वादग्रस्त कॉमेंट केल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला गोरक्षकांनी केली मारहाण

विशेष प्रतिनिधी

पुणे : इस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवर विवादास्पद कॉमेंट केल्याने गो रक्षक कार्यकर्त्यांनी बजरंग दलाचा सदस्य असलेल्या १७ वर्षाच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन “तू परत भेट तुला मारुन टाकतो,” अशी धमकी दिली. हे सर्व जण एकत्र असतात. केवळ इस्टाग्रामवर कॉमेंट केल्यावरुन त्यांच्यात वाद झाला आहे.
( Bajrang Dal worker beaten up by cow vigilantes for controversial comment on Instagram photo)

याबाबत ग्रेसिया सोसायटीत राहणार्‍या एका १७ वर्षाच्या मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषी कामठे (वय २९, रा. हडपसर), प्रसाद नाईक (वय २२, रा. साळवे गार्डन, कोंढवा), आकाश पवार (वय २५, रा. कोंढवा), राहुल कदम (वय २६, रा. आंबिकानगर, अप्पर), कुणाल पाटील (वय २४, रा. साळवे गार्डन, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील ग्रेसिया सोसायटीच्या पार्किंगमध्ये रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचे ९ वीपर्यंत शिक्षण झाले असून सध्या काही काम करत नाही. तो बजरंग दलाचा सदस्य असल्याचे समजते. तर आरोपी हे गो रक्षक म्हणून कार्य करतात. फिर्यादीचा मित्र स्वयम दळवी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एप्रिल महिन्यातील रामनवमीचा फोटो टाकला होता. त्यावर फिर्यादीने हाकाललेली संस्था अशी कॉमेंट केली होती. रविवारी सायंकाळी ४ वाजता ही कॉमेंट टाकली होती. त्यानंतर ऋषि कामटे याचा फिर्यादीला फोन आला तु इन्स्टाग्रामवर कॉमेंट का टाकली, तु भेटायला ये, असे म्हणाला. तेव्हा फिर्यादीने त्याला तो बाहेर असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता फिर्यादीचा मित्र राकेश शुक्ला याने फोन करुन ऋषि कामठे, प्रसाद नाईक व आकाश पवार हे भेटायला पार्किंगमध्ये आले आहेत, तू खाली ये, ते माझे चांगले मित्र आहेत. तुला काही करणार नाही, असे म्हणाला. तेव्हा फिर्यादी त्यांना भेटण्यासाठी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आला. ऋषि कामठे याने तु इन्स्टाग्रामवर काय कॉमेंट टाकली, असे विचारले. तेव्हा मी त्यास कसली कॉमेंट टाकली, याबाबत विचारले असता त्याने कानाखाली मारली. नाकावर जोरात बुक्की मारली. त्याने त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. तो खाली पडल्यावर इतरांनी त्याला लाथा बुक्क्यांनी त्याच्या पोटात, पाठीवर, तोंडावर व डोक्यात मारहाण करु लागले. तेव्हा त्याचे वडिल, आई, मित्र यांनी येऊन सोडविले. आकाश पवार याने त्याच्या गाडीला लावलेली स्टीक काढून अंगावर धावुन येऊन “मला तू परत भेट तुला मारुन टाकतो,” अशी धमकी दिली.
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, फिर्यादी मुलगा हा बजरंग दलाचा सदस्य असल्याचे सांगतो. तो व आरोपी हे एकत्र असतात. इन्स्टाग्रामवर कॉमेंट केल्यावरुन त्यांनी मारहाण केली. पाचही जणांना नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *