डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने बापुजी बुवा चौक, रामनगर येथे नागरिकांच्या तक्रारी आणि स्थानिक सुरक्षेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी ‘जनसंवाद कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले.ला पोलिस उपायुक्त (परिमंडळ ३) संभाजी कदम प्रमुख पाहुणे होते. ( Police conductspublic dialogue in Warje Malwadi for the safety of citizens)
कार्यक्रमास सुमारे २०० नागरिक (पुरुष व महिला) उपस्थित राहिले. नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. रामनगर परिसरातील प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी केली. अवैध दारू व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची गरज, रात्रीच्या वेळी काही युवकांकडून दारूच्या नशेत आरडाओरडा व चौकात गोंधळ निर्माण होतो, तसेच पोलिस चौकी अनेकदा बंद असते, अशा तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या.
या सर्व तक्रारींवर प्रतिसाद देताना पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट संदेश दिला, की “रामनगर परिसरात कोणतीही गुन्हेगारी सहन केली जाणार नाही. अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.”
कदम यांनी पुढे सांगितले, की रामनगर परिसरात रात्री गस्त वाढविण्यात येईल. पोलिस चौकी २४ तास नागरिकांच्या तक्रारींसाठी खुली असेल. अल्पवयीन मुलांकडून गुन्हे झाल्यास त्यांच्या पालकांनाही आरोपी करण्यात येईल. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद किंवा गुन्हेगारी हालचाल दिसल्यास त्वरित ‘डायल 112’ वर संपर्क साधावा.
कार्यक्रमास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, तसेच निलेश बडाख, संजय नरळे, दिपाली लुगडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस अंमलदार आणि कर्मचारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या पुढाकाराचे स्वागत करत, “अशा संवाद कार्यक्रमामुळे नागरिकांचा विश्वास वाढतो आणि परिसर सुरक्षित राहतो,” अशी भावना व्यक्त केली.
