माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे उद्विग्न होत एक मागणी केली आहे. दुधाला भावच नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत प्रचंड नाराज झाले आहेत. देशी दारूच्या एका बाटलीची जेवढी किंमत आहे, तेवढे पैसे आम्हाला नकोत. पण देशी दारूच्या एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढी किंमत एक लिटर दुधाला द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला आणि या दरम्यान सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी ही मागणी करत राज्य सरकारला इशाराही दिला आहे. 22 मे रोजी पुण्यामध्ये दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. त्याची दखल घेऊन दुग्धविकास मंत्रालयाने बैठक लावली आहे. या बैठकीत आम्ही दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटलं आहे.
गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणं अवघड नाही. त्यामुळे महागाई वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित मनाने कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. त्या शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
