महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थितीही याच नाराजीचे कारण असल्याचे समजते. कारण, शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदासाठी वाट पाहत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मोठा दावा केला होता. आता, तो दावा शिवसेना नेते आणि मंत्री संदीपान भुमरेंनी खोडून काढला आहे.
“शिवसेनेचा एकही आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात नाही. उलट त्यांचे जे उरलेले आमदार आहेत तेच आमच्या संपर्कात आहेत. त्या आमदारांचीही येण्याची इच्छा आहे. लवकरच तिकडचे काही आमदार इकडे आलेले बघायला मिळतील.” असं भुमरेंनी म्हटलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या अंगावर आमदार धावून गेले अशी चर्चा आहे याविषयी विचारलं असता भुमरे म्हणाले, “जो आरोप होतो आहे त्यात काही तथ्य नाही. असं होणं शक्य आहे का? आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत. आमच्यातला एकही आमदार शिंदेंचा निर्णय डावलणार नाही.”
शिवसेनेत अस्वस्थता असल्याने बंडखोरी केलेले अनेक आमदार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, अशाप्रकारे आठ ते दहा आमदारांनी संपर्क साधल्याचा दावा विनायक राऊतांनी केला. ते म्हणाले की, “आठ ते दहा आमदारांनी गेल्या दोन दिवसांत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधला आहे.”
