नवी दिल्ली: शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले असून आता हे चिन्ह उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही . या सोबतच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. दोन्ही गटाला नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. या दोन्ही गटाचा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी लढा सुरू होता. हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हा विषय निवडणूक विभागागडे पाठवला. या संदर्भात आज दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक सुरू होती. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण नेमका कुठल्या गटाला मिळेल या बाबत निर्णय होण्याची शक्यता होती. दरम्यान निवडणूक आयोगाने आपला निकाल जाहीर केला आहे.
हे चिन्ह दोन्ही गटाला आता वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाची दिल्ली येथील या संदर्भातील बैठक संपली आहे. उद्धव गटाने या संदर्भात घाईने निर्णय देऊ नये असे सांगितले होते.
