धनुष्यबाणाची लढाई, तारीख पे तारीख :ठाकरे गटाने केली पराभवाची तयारी?

नवी दिल्ली : देशाच्या निवडणूक आयाेगासारख्या संस्थेबाबत संशय व्यक्त करून ठाकरे गट पराभवाची तयारी करताेय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आयाेग पक्षपातीपणा करणार आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयाेगाकडे ‘तारीख पे तारीख’ मागितली जात आहे. आयोगाने त्वरीत सुनावणी घेण्यास उद्धव ठाकर गटाने विरोध केला आहे. जो पर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, असे म्हटले आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पक्ष आणि पक्ष चिन्ह याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. धनुष्यबाणावर शिंदे गटाने दावा केल्याने याची सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. उद्धव ठाकरे यांना अंतीम मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार आजच कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसह सगळ्यांचे निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.


निवडणूक आयोगानं त्वरीत सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर करणार करणार असून, ठाकरे गट दुपारी 1 वाजता निवडणूक आयोगाला भेटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पत्राची दखल घेऊन ठाकरेंना पत्र पाठवलं. पण, ठाकरे त्वरीत सुनावणी घेण्यास तयार नाहीत. जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही, तोपर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी अजून 4 आठवडे लागणार असल्याची विनंती उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला करणार आहेत.


अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्य बाण चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या या मागणीचं पत्र ठाकरे गटाला ईमेलवरून पाठवले आहे. यासंदर्भात 8 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडा, असे आदेश निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले आहे. या मुदतीत उत्तर दिले नाही तर निवडणूक आयोग योग्य ती कार्यवाही करेल, असा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा लेखी पत्राद्वारे मुदतीची मागणी केली आहे.


राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे की भारतीय निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो सर्व पक्षांना मान्य करावा लागेल.