मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी टिकते की नाही अशी शंका असताना पवार आणि ठाकरे कुटुंब मात्र ताडोबाचे प्लॅन करत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः ही माहिती दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या दोन मुलाखतीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पवार यांनी अदानी यांचे समर्थन केले. त्याचबरोबर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला विरोध केला.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची चर्चा न करता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्वतः सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, कौटुंबिक विषयांवर यावेळी बोलणे झाले. मी पूर्णवेळ त्यांच्या चर्चेत नव्हते. माझी आणि उद्धवजींची ताडोबावर चर्चा झाली. मला नात्यातला ओलावा मला महत्त्वाचा वाटतो. माझी मुलगी इंग्लंडवरुन आलेली आहे. ती पुढे काय करणार, तिचे करियर आमच्या मुलांच्या भविष्याबाबत चर्चा झाली.
सुळे यांनी हे सांगितले असले तरी तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला आहे.
शरद पवार म्हणाले, आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावे या मताशी आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ अशी बैठक झाली. बैठकीत राजकीय घडामोडी व भविष्याची दिशा यावर चर्चा झाली. महाविकास आघाडीबाबत जाणुनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. महाविकास आघाडी घट्ट आहे. काँग्रेसशीही आमचा संवाद सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये चांगला संवाद आहे. तसेच, काँग्रसचे महासचिवही येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
