विजय वडेट्टीवार आणि आमचा बॉस लवकरच एक असेल, नितेश राणेंचे सूचक ट्विट

विरोधी पक्ष नेत्यानेच पक्षाचा त्याग करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये कायम राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विजय वडेट्टीवार आणि आमचा बॉसलवकरच एक असेल असे सूचक ट्विट भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी केले आहे.

राणे यांच्या ट्विटमुळे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपवरच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. “विजय वडेट्टीवार हे ओरिजनल हिंदुत्ववादी आहेत, असे राणेंनी म्हटलं आहे. ‘लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल’ असे राणेंनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. आपण ओरिजनल हिंदुत्ववादी आहात अशी स्तुतीही केली आहे.

महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? असा सवाल वडेट्टीवार यांनी राणेंना केला होता. याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, कोणी केला महिलांचा अपमान ? हिंदू भगिनींना ‘लव्ह जिहाद’च्या नावाने फसवले जाते तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही. विरोधी पक्ष नेता हा फक्त एका धर्मा च्या बाजूने बोलणारा नसतो, हे लक्षात असू द्या. महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलिसांची काळजी वाटली नाही का ? असो.. आपण ओरिजनल हिंदुत्वादी आहात..आणि आमचे जुने सहकारी पण. काय माहीत तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल. म्हणून.. इथेच थांबतो ! जय श्री राम

देवेंद्र फडणवीस हेच माझे बॉस आहेत, असे नितेश राणे यांनी नुकतेच म्हटले होते. त्यामुळे विजय वडेट्टीवार भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.