आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही; संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांचे अप्रत्यक्ष कान टोचले

महाविकास आघाडीत उशिराने प्रवेश केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अटी आणि शर्तींनी आघाडीचे नेते हैराण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना आघाडीसोबत ‘वंचित’ची गाडी आजही रुळावर आली नाही. ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या जागांच्या फॉर्म्युल्यावर बुधवारच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. आता नवीन प्रस्ताव आंबेडकरांकडून येणार असून नऊ मार्चला होणाऱ्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्नांची शर्थ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीकडून येणाऱ्या सातत्यपूर्ण अटी शर्थींमुळे जागावाटप करताना अक्षरशः हैराण होण्याची वेळ आली आहे. प्रत्येकवेळी बदलती मागणी आणि कोणतीही स्पष्ट न केलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील चर्चेची गाडी पुढे काही गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (7 मार्च) अप्रत्यक्षरीत्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरून त्यांचे कान टोचल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर काल (6 मार्च) महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सामील झाले होते. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपावरती चर्चा केली. मात्र, या बैठकीमधून प्रकाश आंबेडकर उठून गेल्याची चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर यांचे अप्रत्यक्ष कान टोचले.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणले आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो. त्या वेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आघाडी धर्म टिकविण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. शिवसेनेने अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली. काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल, वंचितसोबतच्या बैठकीत काहीच घडलं नाही हे सांगणं बरोबर नाही. वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा फार पुढे गेली आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल, असं काही करणार नाहीत. ज्याप्रमाणे मायावती करत आहेत.त्यांना संविधानाचे रक्षण करायचं आहे आणि आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीआधी किंवा नंतर भाजपसोबत समझोता करणार नाही, याचे लेखी आश्वासन देण्यावरही सर्व पक्षांनी मौन धारण केल्याचे ‘वंचित’चे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. अकोल्याची जागा द्यायला तयार आहोत, पण तोडगा काढा आपण पुढे जाऊ. मात्र त्यावरही चर्चा झाली नाही. त्यामुळे हे सर्व मुद्दे आणि जागांसंदर्भात पुन्हा वेळ मागून घेतलेली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. कदाचित पुढच्या बैठकीत काहीतरी नवीन घडेल, अशी अपेक्षा असल्याचे मोकळे यांनी सांगितले.

मी अजूनही कशात नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबईीतल फोर सिझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यावेळी बैठकीत जागावाटपाबाबत काय ठरले? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी “सध्या मी काहीही बोलणार नाही. तुम्हाला नंतर ब्रिफिंग होईल”, असे उत्तर दिले. त्यानंतर तुम्ही मविआसोबत एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “मी अजूनही कशात नाही. पुढच्या बैठकीमध्ये सगळं ठरेल”, असे आंबेडकरांनी म्हटले. यानंतर तुम्ही बैठकीबाबत समाधानी आहात का? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर “तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरुन काय वाटतं?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी केलेले हेच वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.