विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुण्यातील स्फोटके तयार करण्याच्या कटाशी संबंधित इसीस स्लीपर सेल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दोन फरार आरोपींना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. हे दोघेही २०२३ मधील पुणे आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस) तयार व चाचणी प्रकरणाशी संबंधित आहेत. ( NIAs major action Two absconding accused in Pune ISIS sleeper cell case arrested from Mumbai airport)
अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतत असताना मुंबईच्या टर्मिनल २ वर इमिग्रेशन विभागाने त्यांना अडवले. व अटक केली.
या दोघांविरुद्ध NIA विशेष न्यायालय, मुंबईने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. याशिवाय त्यांच्या माहितीसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
या आरोपींनी आणखी आठ सहकाऱ्यांसह भारतात इस्लामिक स्टेटचा (ISIS) हिंसक अजेंडा राबवण्यासाठी स्फोटके तयार करून भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचला होता. पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्लाने भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके तयार केली जात होती. या काळात २०२२-२३ दरम्यान त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती आणि स्फोटकाची चाचणी देखील केली होती.
या प्रकरणात याआधी अटक : मोहम्मद इमरान खान, मोहम्मद यूनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदवाला, शमिल नाचन, आकिफ नाचन आणि शहनवाज आलम यांना अटक केली आहे.
एनआयएने या सर्व आरोपींविरुद्ध UAPA कायदा, स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
