पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल प्रकरणात नव्या वळण; संजय शिरसाट संजय राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या घरातील बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्या व्हिडीओत पैशांनी भरलेली बॅग असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून आता शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये दोन बॅगा दिसत असून त्यापैकी एकामध्ये नोटांची बंडलं असल्याचा राऊतांचा दावा आहे. “हा व्हिडीओ तुमचा नाही म्हणत असाल, तर आणखी व्हिडीओ प्रसिद्ध करू,” असा इशारा देखील राऊतांनी दिला. राऊतांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय शिरसाट यांनी मात्र तातडीने या व्हिडीओतील बॅग कपड्यांची असल्याचं स्पष्ट केलं आहे. “हो, हा व्हिडीओ माझ्या बेडरूममधलाच आहे. पण त्या बॅगेत कपडे होते, पैसे नव्हते,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्याचबरोबर, “हा व्हिडीओ माझ्या खासगी जागेतील असून, तो काढून कोणाला पाठवला गेला?” यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

शिरसाट सध्या कायदेशीर सल्ला घेत असून, संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. “एक जबाबदार खासदार असं चुकीचं आणि दिशाभूल करणारं चित्र जनतेसमोर मांडतोय. माझी प्रतिमा आणि खाजगी आयुष्य याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय,” असं शिरसाट म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याचंही उघड झालं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांची संपत्ती झपाट्याने वाढल्याचा आरोप होत असून, त्याचाच तपशील आयकर विभाग मागवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

हा व्हिडीओ नेमका कोणत्या माध्यमातून बाहेर गेला?, कुणी तो रेकॉर्ड केला?, आणि तो खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत कसा पोहोचला? — या प्रश्नांची चर्चा आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.