रोहित आठवले
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी कंबर कसली आहे. आज (दि.२९) सकाळी ७ वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेत ते दाखल झाले आहेत. शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली.
( Municipal elections in full swing Ajit Pawar arrives at Pimpri Chinchwad Municipal Corporation at 7 am)
गेल्या आठवड्यात जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधला. त्यानंतर आज अजित पवार थेट महापालिकेत दाखल झाले आहेत. त्यांची आयुक्त शिखर सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. सकाळी सात ते नऊ दोन तास ही बैठक चालणार आहे.
२०१७ ला महापालिकेच्या सत्तेतून राष्ट्रवादी काँग्रेसला पाय उतरवावे लागले होते. शहराचा सर्वांगीण विकास करूनही कथीत भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली होती. आता पुन्हा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरले आहेत. महापालिका आयुक्त हे भाजपा आमदारांच्या तालावर नाचतात. राज्यात सत्तेत असून देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची कोणतीच कामे आयुक्त करत नाहीत अशा तक्रारी अजित पवारांकडे गेल्या होत्या.
म्हणूनच अजित पवार स्वतः सकाळी सात वाजता महापालिकेत दाखल झाले आहेत. त्यांच्या समर्थक आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या प्रभागातील कामे रखडल्यामुळे त्यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. आता अजित पवारांनी घेतलेल्या या बैठकीचा कितपत फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार हे निवडणुकीत स्पष्ट होईलच. मात्र तूर्तास तरी बलाढ्य भाजपाची डोकेदुखी अजित पवार यांनी वाढवली असून येत्या काही दिवसात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा तीव्र संघर्ष पाहायला मिळणार यात शंका नाही.
