विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे युती जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. ( Congress-Vanchit Bahujan Aghadi alliance for Mumbai Municipal Corporation)
ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काँग्रेस आणि वंचित हे ‘नैसर्गिक मित्र’ आहेत. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. याआधी नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढलो, त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. आज तीच भूमिका पुढे नेण्यासाठी आम्ही ‘समविचारी’ म्हणून अधिकृतपणे एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे, आज काँग्रेसच्या स्थापना दिनीच हा ऐतिहासिक युतीचा योग जुळून आल्याने एका नव्या वैचारिक अध्यायाला सुरुवात झाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भारिप सोबत आमची आघाडी होती. 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, आहे.
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाइन बैठकीत युतीला मान्यता दिली आहे. 227 पैकी 62 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
