देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट, माजी महासंचालक संजय पांडे, डीसीपी लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कथित कट रचण्यात आल्याचा निष्कर्ष विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालातून काढण्यात आला आहे. या अहवालात तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली आहे.
( Conspiracy to Frame Devendra Fadnavis in False Case Action Recommended Against Sanjay Pandey DCP Laxmikant Patil and ACP Sardar Patil)

ठाणे नगर पोलिस ठाण्यात 2016 साली दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या पुनर्तपासणीमधून ही बाब उघड झाली आहे. माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्तीपूर्वी गृह विभागाकडे हा अहवाल सादर केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांना विविध प्रकरणांत गोवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले. जुन्या गुन्ह्याचा फेरतपास करण्याच्या नावाखाली पोलिस यंत्रणेवर दबाव टाकणे, साक्षीदारांवर प्रभाव टाकणे आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर ठपका SIT ने ठेवला आहे. या फेरतपासणीवर यापूर्वी उच्च न्यायालयानेही शंका व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते.
विशेष तपास पथकाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे की, माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यातील २०१६ च्या गुन्ह्याचा फेरतपास करण्याचे आदेश देत फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दबाव आणला होता. हा अहवाल रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या केवळ पाच दिवस आधी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे पाठवला होता. त्यात संजय पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

संजय पांडे मुंबईचे पोलिस आयुक्त आणि त्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ठाणे तसेच मुंबईतील सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आधार घेत फडणवीस यांना अडकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय हेतू असल्याचा संशय SIT अहवालातून व्यक्त करण्यात आला असून, पोलिस यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे चित्र समोर आले आहे.

ठाणे नगर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. विकासक संजय पुनमिया आणि अग्रवाल हे एकेकाळी व्यावसायिक भागीदार होते. त्यांच्या वादातून हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि 2017 मध्ये आरोपपत्रही दाखल झाले होते. तरीही, संजय पांडे यांनी या गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश दिले. याच काळात, 2016 मधील गुन्हा फेरतपासाच्या नावाखाली 2021 ते जून 2024 दरम्यान आपला छळ करण्यात आला आणि खंडणी मागितल्याचा आरोप करत संजय पुनमिया यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून संजय पांडे यांच्यासह सात जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणाच्या तपासादरम्यान 2016 मधील गुन्हा पुन्हा उकरून काढण्यात आला. या तपासात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले ध्वनिमुद्रित व चित्रित संभाषण कालिना येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपासात हे संभाषण फडणवीस किंवा शिंदे यांचे नसून, निवृत्त सहायक आयुक्त सरदार पाटील, मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगररचनाकार दिलीप घेवारे आणि विकासक संजय पुनमिया यांच्यातील असल्याचे स्पष्ट झाले.

या ध्वनिमुद्रणातून ‘फडणवीस आणि शिंदे यांना अटक का केली नाही’ असा सवाल संजय पांडे यांनी सरदार पाटील आणि पोलिस निरीक्षक मनोहर पाटील यांना केल्याचे उघड झाले आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदे यांना अटक करण्यासाठी पांडे यांनी मोठा दबाव टाकल्याचा निष्कर्ष SIT ने काढला आहे. याशिवाय, सरदार पाटील यांच्या सरकारी वाहनाच्या वापर नोंद वहीतील 5 मे 2021 ते 21 मे 2021 या कालावधीतील पाने गायब असल्याचेही अहवालात नमूद आहे. ही बाब पुरावे नष्ट करण्याचा गंभीर प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *