विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लेखाला मी लेखानेच उत्तर दिले आहे. सर्व फॅक्ट आणि फिगरसहित उत्तर दिलेले आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशाप्रकारचे बोलणं सोडतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. ( At least now Rahul Gandhi will stop making such statements says Devendra Fadnavis)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दैनिकात ‘मॅच-फिक्सिंग महाराष्ट्र’ हा लेख लिहून गंभीर आरोप केले. 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी टीका राहुल गांधी यांनी शनिवारी केली.
राहुल गांधींच्या याच लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही आरोप केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा आहे. सतत होणाऱ्या अपमानामुळे जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे.
त्यावर फडणवीस म्हणाले की, 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतचे 26 पैकी 25 आयुक्त केंद्र सरकारने थेट नेमले. पहिल्यांदा मोदींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली, असा दावा फडणवीसांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा दुसरा आक्षेप मतदारसंख्या वाढीचा, ज्याला ते बोगस मतदार म्हणतात. यावर फडणवीसांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते. 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार नोंदले गेले. 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार. 2004 ते 2009 मध्ये एक कोटी नवीन मतदार जोडले गेले, त्यामुळे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजिबात होत नाही, असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.
