नगरसेवक देवेंद्र फडणवीस यांचा संघर्ष.. मुख्यमंत्री झाल्यावर झोपडपट्टीधारकांसाठी लोककल्याणकारी निर्णयाचा आदर्श मापदंड

विशेष प्रतिनिधी

नागपूर : तरुण तडफदार नगरसेवक देवेंद्र फडणवीस झोपडपट्टीतील नागरिकांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज उठवतात. महापौर झाल्यावर झोपडपट्टीवासियांना सुविधा देतात, आमदार झाल्यावर सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न सुटत नसल्याने मोर्चा काढतात. मुख्यमंत्री झाल्यावरही केवळ याच झोपडपट्टीचा नव्हे तर लाखो झोपडपट्टीधारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला लोककल्याणकारी निर्णय आता एक आदर्श मापदंड झाला आहे. या निर्णयामुळे नागपूर येथील 426 झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर प्रत्यक्ष साकारले गेले आहे. ( Corporator Devendra Fadnavis struggle Ideal criteria for public welfare decisions for slum dwellers after becoming Chief Minister)

वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस नागपूरमधील लक्ष्मीनगर भागाचे नगरसेवक झाले. दहा वर्षे ते या भागाचे नगरसेवक होते. याच काळात त्यांनी सर्वात तरुण वयाचे महापौर होण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला. नंतर ते आमदार झाले. विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला. मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याची धुरा सांभाळू लागले. पण त्या झोपडपट्टीवासीयांना आणि त्यांच्यासाठी केलेला संघर्षही ते विसरले नाहीत.

नगरसेवक असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीतील प्रश्नांबाबत वारंवार आवाज उठविला. पुढे महापौर झाल्यानंतर या झोपडपट्टीसाठी सुविधेला त्यांनी प्राधान्य दिले. या झोपडपट्टीवर शाळेसाठी आरक्षण होते. ते उठविण्यासाठी 1999 नंतर या भागाचे आमदार या नात्याने एनआयटीकडे पाठपुरावा केला. प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांनी एनआयटीवर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले अशी आठवण नागपूरमधील ज्येष्ठ सांगतात. त्यामुळेच अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी धारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला भाडे पट्टा देण्याच्या लोककल्याणकारी निर्णय आता एक आदर्श मापदंड म्हणून नावारुपास आला आहे. नागपूर येथील तब्बल 426 झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर प्रत्यक्ष साकारले गेले आहे. या 426 झोपडपट्टीमधील एक असलेल्या लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टीने आता जुन्या पाऊलखुणा पुसत श्रमीकनगर म्हणून आपल्या झोपडपट्टीचे नामकरण केले आहे.

या निर्णयाच्या माध्यमातून झोपडपट्टीमधील जे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गात असणाऱ्यांना रमाई आवास योजनेत, तर आदिवासी प्रवर्गातील व्यक्तींना शबरी आवास योजनेत व इतर प्रवर्गातील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली आहेत. एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन कटिबद्ध आहे.

१९८९ मध्ये मी शिवाजी कॉलेज येथे दहा रुपये रोजंदारीवर कामाला होतो. स्वत:च्या पक्क्या घराचे स्वप्न अशक्य होते. पैशाची जुळवाजुळव करत 150 रुपयात मी लक्ष्मीनगर झोपडपट्टीत एक झोपडी घेतली. हक्काचा निवारा झाला पण यात कायदेशीर मालकी नव्हती. एका बाजूला जगण्याचा संघर्ष दुसऱ्या बाजूला हक्काच्या कायदेशीर निवाऱ्याचा संघर्ष आमचा सुरु झाला. माझ्यासारखे या झोपडपट्टीत एकूण 110 झोपडपट्टीधारक होते. या संघर्षाला भक्कम साथ दिली ती तेव्हाचे आमचे नगरसेवक देवेंद्र फडणवीस यांनी. आम्हालाही तेवढेच सन्मानाने जगता यावे ही त्यांची भूमिका परिपक्व राजकीय कृतिशीलतेची होती. मनपाचे नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी आमचे सारे प्रश्न मार्गी लावले असे लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील रामदास वुईके सांगतात.

लक्ष्मीनगर येथील एनआयटीच्या जागेवर असलेल्या या 110 घराच्या वस्तीला 1990 मध्ये झोपडपट्टी म्हणून मान्यता जाहीर झाली. शहर विकास मंच यांच्या लढ्यामुळे एनआयटी व मनपाने येथील नागरी सुविधेला आकार दिला. येथे राहणारे नागरिक हे बांधकाम व्यवसायात काम करणारे मजूर तर आजुबाजुला घरची कामे करणाऱ्या महिला, काही नोकरदार आहेत. 1990 ते 2000 पर्यंत ही वस्ती येथील गुंडगिरीमुळे बदनाम होती. मात्र नागरी सुविधेमुळे विकास होत गेला. आता आमची दुसरी पिढी ही पूर्णत: पदवीधर व चांगल्या मार्गाने जगणारी झाली” असे वुईके यांनी सांगितले.

“या झोपडपट्टीच्या क्षेत्रावर एनआयटीचे शाळेसाठी आरक्षण होते. आम्ही जिथे राहत होतो त्या जागेची मालकी इतरांच्या नावावर होती. आखीव पत्रिका आमच्या नावावर घेणे शक्य नव्हते. “मुख्यमंत्री पदावर फडणवीस विराजमान झाल्यानंतर 2017-18 च्या कालावधीत त्यांनी येथील आरक्षण हटवून झोपडपट्टी वासियांना हक्काचा आसरा दिला, असे ज्येष्ठ पत्रकार तथा शहर विकास मंचचे मुख्य संयोजक अनिल वासनिक यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे पट्टे वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांच्या माध्यमातून निराधारांना जी घरे दिली त्याला तोड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर महानगर व ग्रामीण भागातील गरीब लोकांना पट्टे वाटपासह इतर दिलेल्या योजना लाखमोलाच्या ठरल्या. अनेक भागात नागरी सुविधा पोहचल्या. लक्ष्मीनगर येथे नवबौद्ध व इतर समाजाची संख्या अधिक आहे. सर्वांच्या मताचा आदर करुन या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्ही लोकवर्गणीतून उभा केला. लोकवर्गणीतून या पुतळ्यावर छोट्या छत्रीचे कामही झाले. त्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते करण्याचा आग्रह तेव्हा लोकांनी धरला. याचे लाकार्पण करण्याअगोदर त्यांनी या परिसरात असलेल्या अडसरांना दूर केले.