एमपीएससी परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा : देवेंद्र फडणवीस



एमपीएससीच्या परीक्षा सतत पुढे ढकलण्यात येत आहेत. यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नवनवीन समस्या उद्भवत आहेत. असे असताना, एमपीएससी परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा |” असे त्यांनी म्हटले आहे.



येत्या रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. असे असताना महाविकास आघाडीवर सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. सत्तेतील एक घटपक्ष काँग्रेसने देखील या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यामुळे आघाडी सरकार आता जनतेच्या निशाण्यावर आहे. सरकारच्या एका निर्णयाची शिक्षा केवळ विद्यार्थ्यांनाच का ? असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे.