
“सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत घेण्याचे निर्णय दिले आहेत. आणि सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या चुकीमुळे ओबीसीसमाजाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे.” असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज नागपुर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि, “या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी होणार आहे. योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कार्यवाही करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही. हा संपूर्ण निकाल आम्ही समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील भूमिका मांडू.”
“हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्ष या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला. न्यायालयाने नवीन कायदा रद्द केला नाही. पण, सरकारच्या कार्यपद्धतीवर मात्र तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत.” असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
राज्य सरकाने गेल्या दोन वर्षात केवळ टाइमपास केला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. एकूणच सरकारच्या चुकीच्या धोरणांपाई सामान्य माणसाचे महाराष्ट्रात हाल होत आहेत, असे आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.
या निर्णयावर ओबीसी समाजाची काय प्रतिक्रिया असणार? हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
