हे करणे नक्कीच कठीण आहे, मात्र याचा फायदाच होणार. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शनला आमचे पूर्ण समर्थन आहे. असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, “गेल्या वेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली होती, त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये ५ वर्षातील जवळ जवळ एक वर्ष महाराष्ट्रातील कुठल्यान कुठल्या भागामध्ये आचारसंहिता असते. म्हणजे आपण एक संपूर्ण वर्ष केवळ निवडणूकीत घालवतो. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शनला आमचे पूर्ण समर्थन आहे.”

केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाची हीच परिस्थिती :
“केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशात देखील अशीच परिस्थिती आहे. प्रत्येक राज्याच्या निवडणूका त्यानंतर इचर निवडणूका, पोटनिवडणूका या सतत होत असतात. या ऐवजी सगळ्या निवडणूका जर एकत्र झाल्या तर त्यामुळे खर्च देखील वाचेल, एक व्यवस्थित पद्धतीने निवडणूका होतील, मतदारांना देखील व्यवस्थितपणे सर्व माहिती असेल आणि राजकीय पक्षांना देखील सोयीचे राजकारण न करता, एक भूमिका घेऊन समोर जावे लागेल. त्यामुळे हा निर्णय संपूर्ण देशासाठी फायद्याचाच ठरेल.” असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ‘वन नेशन वन इलेक्शनसाठी इलेक्शन कमिशन अर्थात निवडणूक आयोग तयार आहे.” असे वक्तव्य केल्यानंतर सध्या देशात केवळ वन नेशन वन इलेक्शनचीच चर्चा आहे. तसे झाले तर संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणूका होतील. हे कसे शक्य होईल आणि यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळापासून ते इतर साधनांपर्यंत सगळ्याची व्यवस्था येत्या काळात कशी होईल, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
