स्त्री शिक्षणाच्या जननी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १९२ वी जयंती. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने आता दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी हा दिवस ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले अनेक मुली आणि महिलांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्यांनी मुलींसाठी आणि समाजाच्या नाकारलेल्या वर्गातील लोकांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी मुली आणि महिलांच्या शिक्षणात विशेष योगदान दिले आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १२ वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि जोतिरावांना स्वतःची मुले नव्हती. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी १८ शाळा उघडल्या.

त्यांनी शूद्रांसाठी, अस्पृश्यांसाठीही शाळा काढल्या. रात्रशाळा काढल्या. विधवांना पुनर्विवाहासाठी सहाय्य केलं. बालहत्त्या प्रतिबंधक गृह काढलं. इतकंच काय. विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संपही घडवून आणला. दुष्काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. दारु दुकान सुरु करण्यास विरोध केला. सत्यशोधक समाज स्थापण केला आणि त्यामार्फत पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली.

देशातील पहिली मुलींची शाळा उघडल्यानंतर सुमारे ४ वर्षांनी सावित्रीबाई फुले यांनी १८५२ मध्ये दलित मुलींसाठी स्वतंत्र शाळा उघडली. याशिवाय त्यांनी देशातील किसान स्कूलचीही स्थापना केली होती.

देशात प्लेगच्या साथीने भयंकर विळखा घातला असताना त्यांनी रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांना प्लेगची लागण झाली. आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलेल्या सावित्री बाईंची १० मार्च १८९७ रोजी प्राणज्योत मावळली.