मुंबई: विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणणे याेग्य नाही असे वक्तव्य केले हाेते. त्याच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उतरले हाेते. मात्र, ज्याची जशी आस्था असेल त्याने ते म्हणावे अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यावर आव्हाड यांनी यूटर्न घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचे आव्हाडांनी मान्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाने वाद निर्माण झालेला असताना कालच जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असे विधान करून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. त्यावर सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर आव्हाडांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आव्हाड यांनी पुन्हा एकदा युटर्न घेत छत्रपती संभाजी महाराज हे जसे स्वराज्य रक्षक होते तसेच धर्मवीरही होते असे विधान केले आहे. आव्हाड यांनी अजित पवार यांच्या भूमिकेविरोधात वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाता-जाता त्यांनी शेवटी पुन्हा एकदा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म असून त्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नसल्याचे गोंधळून टाकणारे विधान केले आहे.
