पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमवावे लागलेल्या ठाकरे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीत आणखी दणका बसणार आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून काॅंग्रेस या निवडणुकीत स्वतंत्र लढणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे माेठे आव्हान उध्दव ठाकरे यांच्यासमाेर आहे. त्यामुळे कमकुवत झालेल्या ठाकरे गटाला आस्मान दाखविण्याची संधी म्हणून काँग्रेस या निवडणुकीकडे पाहत आहे. त्यामुळे काॅंग्रेसने उमेदवारांची प्रभागनिहाय चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेत सर्वच्या सर्व 227 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे म्हणत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले मुंबई महापालिका निर्माण झाल्यापासून सगळ्या जागा लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. आम्ही आघाडीची सरकारे केली. पंधरा वर्षे आम्ही सत्तेत होतो. २००७ मध्ये सर्वात जास्त 74 जागा आमच्याकडे होत्या. २०१२ मध्ये एकत्र लढल्यानंतर ७४ वरून आम्ही ५८ वर आलो. राष्ट्रवादीकडे ८ जागा होत्या त्यांना १४ जागा मिळाल्या त्यांचा फायदा झाला.आमचा फायदा झाला नाही माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे ती म्हणजे महापालिका आम्हाला स्वबळावर लढायची आहे. मात्र आमचे वरिष्ठ जे ठरवतील ते आम्हाला बंधनकारक आहे. राहुल गांधी यांनाही याबाबत कल्पना दिली असल्याचे जगताप म्हणाले आमच्या 227 व्या क्रमांकावरील उमेदवारालाही यापूर्वी 600 पेक्षा जास्त मते मिळाली हाेती. याचा अर्थ काॅंग्रेसची ताकद आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता लढतो आहे. त्याचे काम आहे हात से हात जोडो अभियानाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे अध्यक्ष म्हणून मला माझ्या कार्यकर्त्यांची बाजू घ्यायची आहे.
