आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. केंद्रात सत्ता हवी असेल तर उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. याच कारणामुळे भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष दिले आहे.
येथील मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून खास मोहीम राबवली जात आहे. ‘स्नेह मिलन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा येथील मुस्लीम मतदारांशी संवाद साधत आहे. संमेलनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, केंद्रीय मंत्री आणि मुझफ्फरनगरचे खासदार संजीव बालियान, राज्यमंत्री सोमेंद्र तोमर यांना आमंत्रित केले जाणार आहे.
मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खास मोहीम
मुझफ्फरनगरमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने आखलेल्या रणनीतीबद्दल भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कुंवर बासित अली यांनी अधिक माहिती दिली आहे. “पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जवळपास २.५ ते तीन लाख अल्पसंख्याक मतदार आहेत. या मतदारांचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. कृषीउद्योगात गुंतलेल्या मतदारांपर्यंत भाजपा तेवढ्या प्रभावीपणे पोहोचू शकलेला नाही. सहारनपूरमध्ये जवळपास १.८ लाख तर मुझफ्फरनगरमध्ये जवळपास ८० हजार राजपूत मुस्लीम आहेत. शामली येथे जवळपास एक लाख गुज्जर मुस्लीम तर मुझफ्फरनगरमध्ये एक लाख जाट मुस्लीम आहेत,” असे अली यांनी सांगितले.
आम्ही या मतदारांना, आपला एकच डीएनए आहे, आपण एकाच देशातील नागरिक आहोत, आपल्याला एकत्र येऊन देशाला पुढे घेऊन जायचे आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न करू,” असे अली यांनी सांगितले.
