शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. अगदी मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांना माझ्यामुळेच एक वर्ष जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची संधी मिळाली होती, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. आज संजय पवार हे सुध्दा माझ्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्याचे पाटील म्हणाले. मी बोललो नसतो, अथवा आमच्या सात लोकांनी पाठींबा दिला नसता तर गुलाबराव देवकर हे अध्यक्ष झालेच नसते. एक गुलाब ने दुसरे गुलाब को मदत किया असेही पाटील म्हणाले.मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला होता कदाचित हा सत्तेचा प्रयोग फसला असता तर? मात्र तरीदेखील मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी सांगितलं. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असंही त्यांनी सांगितलं.
