यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास ठरला आहे. कारण एस.एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’ गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील पटकावला होता. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
तर दुसरीकडे ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटानं ऑस्कर पटकावला आणि क्षणार्धातच या माहितीपटाला साकारणाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची कहाणी अतिशय असामान्य असून, यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांच्यातील नातं हळुवारपणे उलगडून सांगण्यात आलं आहे. एक दाक्षिणात्य जोडपं अनाथ हत्ती (रघू)ची जबाबदारी घेतं आणि त्याला वाचवण्यासाठी जी मेहनत करतं यावर माहितीपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. कार्तिकी गोंसालवीसच्या दिग्दर्शनाका साकारलेल्या या माहितीपटाची निर्मिती सिख्या एंटरटेनमेंटनं केली आहे.
याच्या आधी ए आर रहमान यांच्या जय हो या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार मिळाला होता. आता तब्बल 14 वर्षांनी भारताला हा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सर्व भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
