आम्ही विना पेन्शन, अर्ध्या पगारावर काम करायला तयार; व्हायरल मॅसेजमुळे एकच खळबळ

कोल्हापूर : जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला समाजातील विविध स्तरातून विरोध होत आहे. विरोधाच्या या वातावरणात आता सुशिक्षित बेरोजगार युवक युवती देखील आक्रमक होताना दिसत आहेत. कोल्हापुरात बुधवारी एका व्हायरल झालेल्या मेसेजने खळबळ उडवून दिली. अगदी संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या छातीत धडकी भरावी असा इशारा देणारा आशय या व्हायरल मेसेज मध्ये आहे.

‘जुनी पेन्शन रद्द करा, महाराष्ट्र वाचवा’, ‘आम्ही तयार आहोत, अर्ध्या पगारावर काम करायला तेही पेन्शनविना….’ असा उल्लेख असणारा आणि शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्‍या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारा संदेश बुधवारपासून व्हायरल होत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरूवात करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर जुन्या पेंशनच्या विरोधात निवेदन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांना जुनी पेंशन योजना बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. हे निवेदन देण्यासाठी बेरोजगार युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.