राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरात कारवाई; पालिकेचं पथक हातोडे घेऊन पोहोचलं

मुंबई, 23 मार्च : माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात केला होता. राज ठाकरे यांच्या या आरोपाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. माहीम दर्गा परिसरातील हे अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

माहीमच्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेच्या लोकांनीही हे पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजीअली तयार केली जात आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले होते.

पालिकेचे अधिकारी आणि कामगारांनी याठिकाणी येताना सोबत पाडकामासाठी वापरण्यात येणारे मोठे हातोडे, दोरखंड आणि घमेली आणली होती. त्यामुळे माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरातील चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय, माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक जेसीबीही आणण्यात आला आहे. जेणेकरून मजारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या पाडकामानंतरचा ढिगारा तात्काळ हटवण्यास मदत होईल.