बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा फॅशनमुळेही चर्चेत असतो. सोबतच, करणचा ‘कॉफी विथ करण’ देखील हा शो बराच चर्चेत असतो. करणचे सातही सीझन चांगलेच हिट ठरल्यानंतर लवकरच आठवा सीझन करण घेऊन येत आहे. आठव्या सीझनची सोशल मीडियावर चर्चा अधिक असताना, त्याच्या आगामी भागात कोणते सेलिब्रिटी येणार अशी चर्चा सध्या होत आहे.
इतर सीझनप्रमाणेच ‘कॉफी विथ करण सीझन 7’सुद्धा गॉसिप्सनी भरलेला होता. विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, समांथा रूथ प्रभू, अक्षय कुमार, कतरिना कैफ, अशा कित्येक सेलिब्रिटीजनी या सीझनमध्ये हजेरी लावली. आता ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या सीझनची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार लवकरच ‘कॉफी विथ करण’चा सीझन ८ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये एका पेक्षा एक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पहिल्या भागापासूनच हा कार्यक्रम मनोरंजनात्मक असणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सहभागी होणार असल्याचं समोर आलं आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या सिनेमाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. तसेच त्याचा ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
‘कॉफी विथ करण’मध्ये प्रामुख्याने बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होत असतात. पण यंदाचं पर्व थोडं खास आहे. या पर्वात ‘केजीएफ’ फेम यश, ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन, ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ‘कॉफी विथ करण 8’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार्सचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच हे पर्व खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. यावर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा टॉक शो पुन्हा येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर या सीझन ८ मध्ये मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे.
