मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याच्या वृत्यावरून भरत गोगावले यांचा संताप, म्हणाले त्या पेपरला काही स्वप्न पडले का?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा तयार ठेवावा, अशा सूचना केंद्राने दिल्याची बातमी एका गुजराती भाषेतील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या प्रकारावर शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी संताप व्यक्त केला. त्या पेपरला काही स्वप्न पडले का? असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे आमदार अपात्र ठरणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न सातत्याने चर्चिले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका गुजराती भाषेतील वृत्तपत्रात तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा तयार ठेवावा, अशा सूचना केंद्राने दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

गोगावले म्हणाले, त्या पेपरला काय स्वप्न पडले आहे का? अशा कोणत्याही बातम्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. शिंदे साहेब हे शिंदे साहेब आहेत ते कुणी दुसरे नाहीत. अशा बातम्या नेहमीच कुणी ना कुणीतरी देत असते त्यातीलच ही एक बातमी आहे. तुम्हाला पुढे काय ते कळेलच.

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राऊतांनी खारघर दुर्घटनेतील मृतांचा आकडा सांगितला. उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांचा त्यांनी दिलेला आकडा सिद्ध झाला तर जे बोलतील ते ऐकू, पण सिद्ध नाही झाला तर हे उलट्या पायानं चालायला तयार आहेत का?