आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पत्र व्हायरल करणाऱ्याला पुण्यातून अटक

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारच्या विरोधात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र लिहिणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. हे पत्र त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. शुभम काळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. काळे याला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये रायगड पोलिसांनी त्याला आज अलिबाग न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खारघर येथे देण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लेटरहेडवर आपलं म्हणणे मांडलं होतं. त्यामध्ये त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर त्याच पत्राचा आधार घेऊन सोशल मिडियावर सरकारच्या विरोधात डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाजप आणि शिवसेनेला मदत करू नका अशा आशयाचे बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्याची दखल रायगड पोलिसांनी घेऊन गुन्हा दखल करत पात्र व्हायरल करणाऱ्याला पुण्यातून अटक केली आहे.

काय म्हणले होते बनावट पत्रात
धर्माधिकारी यांच्या नावाने त्यांच्या लेटरहेडवर असलेल्या पत्रात म्हटले होते की राज्य सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे मला व माझ्या साधकांना त्रास झाला. मी पुरस्कार नको बोललो होतो, मला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला भाग पाडले. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला व त्यांचा जीव घेतला, माझ्या साधकांसाठी साधा मंडप ही टाकला नाही. वरुन भाजपचे मुनगंटीवार बोलतात मीच सांगितला कार्यक्रम दुपारी घ्यायला. हो मी सांगितले दुपारी घ्यायला, पण त्यांनी तशी सोय पण करायला हवी होती. झालेल्या घटनेची मी पुर्ण जबाबदारी घेऊन सर्व श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका.मी लवकरच पुरस्कार आणि राशी सरकारला परत करत आहे.