नवी दिल्ली : काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मौत का सौदागर अशी टीका केली. ही एक मोठी चूक ठरली आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंधरा वर्षांनंतर कर्नाटकात त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर विषारी साप अशी टीका केली आहे. यावरून खरगे यांचा जोरदार निषेध होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन स्वरूपाची वैयक्तिक टीका जनता स्वीकारत नाही. आजपर्यंतचा हा इतिहास आहे. मात्र निवडणुकात वैफल्यग्रस्त झाल्यावर काँग्रेस नेत्यांना बोलण्याचे भान राहत नाही.2007 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका होणार होत्या. यावेळी राष्ट्रीय माध्यमांनी अंदाज वर्तविला होता की काँग्रेस निवडणुका जिंकू शकतो. मात्र प्रचारात सोनिया गांधी यांचे बहुचर्चित मौत का सौदागर हे विधान आले. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.त्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या बळावर हे विधान काँग्रेसवरच उलटवले आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
त्यांनतर दहा वर्षांनी 2017 मध्येही गुजरातमध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र कांग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांच्यावर नीच म्हणून टीका केली. गुजराती जनतेने हा आपल्या अस्मितेवर हल्ला समजून काँग्रेसला धडा शिकवला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौकीदार चोर है असा आरोप केला. राफेल विमान सौद्या संदर्भात त्यांनी शंका व्यक्त केली. मात्र भ्रष्टाचार आणि मोदी हे जनता मान्यच करू शकली नाही. काँग्रेसचा पराभव झालाच पण अमेठी या पारंपरिक मतदारसंघात राहुल गांधी यांना लोकांनी नाकारले.
आताही कर्नाटकात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस आहे. काँग्रेस कदाचित निवडणूक जिंकूही शकतो असे म्हटले जाते. त्याच वेळी खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत हीन टीका केली आहे. मोदी हे साप आहेत. तुम्ही म्हणाल ते विषारी आहेत की बिनविषारी? तर त्याचं उत्तर आहे की संपर्कात आलात मरण नक्की, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून खरगे यांचा जोरदार निषेध केला जातो आहे. कर्नाटकातील जनता या टीकेला देईल असे भाजपचे नेते म्हणत आहेत.
